पोलीस भरतीतील लेखी परीक्षेतील प्रकार; भांडुप पोलिसांकडून उमेदवाराला बेडय़ा

पेनड्राईव्हच्या आकाराचे मायक्रो सीम अ‍ॅडॉप्टर, त्यातून काढलेल्या तांब्याच्या तारा, त्याला जोडलेला इअर फोन अशी जबरदस्त तयारी करून पोलीस भरतीतील लेखी परीक्षेत कॉपी करणाऱ्या गणेश शंकर राणे या वरळीतील तरूणाला भांडुप पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. यंदाची परीक्षा त्याची अखेरची संधी होती. त्यामुळे काहीही करून लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्याने हा उपद्व्याप केल्याचे तपासातून उघड झाले आहे. भांडुपच्या पराग विद्यालयातील केंद्रावर बुधवारी ही कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे पहिल्यांदाच कॉपी करण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक श्रीपाद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपी या यंत्रणेद्वारे फक्त आलेला फोन स्वीकारू शकत होता. त्याला फोन करून परीक्षेतील उत्तरे सांगणारा कोण, गुन्हयात वापरलेले सीमकार्ड आदी बाबींचा शोध घेतला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार राणे याने याआधी तीनदा पोलीस भरतीत आपले नशीब आजमावले. मात्र प्रत्येकवेळी लेखी परीक्षेत घोडे अडल्याने यंदाची अखेरची संधी गमवायची नाही या इराद्याने त्याने परीक्षेआधी कॉपी करण्यासाठी ही यंत्रणा उभी केली होती. भांडुपच्या पराग विद्यालयातील केंद्रावर राणे परीक्षा देणार होता. परीक्षा वर्गातील सह पर्यवेक्षक पोलीस शिपाई जगदाळे यांना राणेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. राणे गालाला हात लावून सतत तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय हे पाहून जगदाळे यांनी परीक्षा केंद्राचे नियंत्रक व सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर यांना ही बाब कळवली. त्यांनी लागलीच पंच, छायाचित्रकार बोलावून राणेची झडती घेतली. तेव्हा त्याच्या पॅन्टच्या खिशात पेनड्राईव्हच्या आकाराचे मायक्रोसीमकार्ड अडॉप्टर सापडले. त्यात सीमकार्ड होते. या अ‍ॅडॉप्टरमधून केसाच्या आकाराच्या तांब्याच्या तारा बनीयनच्या शिलाईमधून कानापर्यंत आणलेल्या दिसल्या.

त्याला जोडलेला इअर फोन आढळला. या यंत्रणेच्या आधारे प्रश्नपत्रिका हाती मिळताच त्यातील प्रश्नांचीउत्तरे तो विचारून लिहित होता. याआधी व्ही. पी. रोड व सहार पोलिसांनी लेखी परीक्षेत बसलेल्या दोन तोतया उमेदवारांना अटक केली आहे.