किराण्याचा तपशील, वाहनाच्या नियंत्रणाची माहिती पुरवणारे तंत्रज्ञान

घरातल्या निर्जीव वस्तू आपल्याशी संवाद साधू लागल्या तर..? टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारी वस्तू आपल्याला हात वर करताच ऑनलाइन खरेदी करता आली तर..? गाडीत बसल्या बसल्या ऑफिसची किंवा घरातली कामे करता आली तर..?

वरील सर्व गोष्टी अशक्य आहेत, असे वाटत असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आवाका आलेला नाही, असेच म्हणावे लागेल. कारण मुंबईत झालेल्या ‘मायक्रोसॉफ्ट फ्यूचर डीकोड’ या कार्यक्रमात केवळ या शक्यतांचे सादरीकरणच झाले नाही तर त्यांची एक झलकही पाहायला मिळाली.

मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी केलेल्या विविध नवीन प्रयोगांचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी व धकाधकीच्या जीवनात दैनंदिन कामकाज सोपे व्हावे यासाठी अनोखे तंत्राविष्कारांचे सादरीकरण या वेळी झाले. आपल्या वाहनाचे  नियंत्रण आपल्या मोबाइलमध्ये आले आहेच. पण याच्याच जोडीला वाहनात बसल्या बसल्याही कार्यालयीन तसेच घरगुती काम करता येणार आहे, तेही फोनला स्पर्श न करता. मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या नव्या अ‍ॅपच्या मदतीने वाहनाचे हेडलाइट नियंत्रित करता येणार आहेत. तसेच घरातील शीतकपाटात कोणता पदार्थ संपला आहे याची माहितीही घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर, या अ‍ॅपवरून जवळच्या किराणा मालाच्या दुकानातून त्या सामानाची ऑर्डरही करता येणार आहेत. आपल्या मोबाइलद्वारे येणारे लघु संदेश किंवा ई-मेल यांना उत्तरे पाठविण्याची सुविधाही आहे. हे अ‍ॅप लवकरच बाजारात येणार असून त्यासाठी कंपनीने गाडय़ांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी सहकार्य करार केले आहे. गाडय़ांच्या नव्या आवृत्त्यांमध्ये ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.

या प्रदर्शनात ‘मॅजिक मिरर’चेही सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एक्सबॉक्सचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून या माध्यमातून ई-व्यापर संकेतस्थळावर खरेदी करता येणार आहे. यामध्ये आपण एका टीव्हीसमोर उभे असतो. टीव्हीला स्पर्श न करता केवळ त्यांच्या समोर उभे राहून हात वर करून पर्याय निवडायचा आहे. आपण एखादा टी-शर्ट निवडला तर तो चारही बाजूंनी पाहता येतो. इतकेच नव्हे तर आपल्याला तो कसा दिसतो हेही आभासी रूपाने पाहणे शक्य होते. हे तंत्रज्ञान सध्या जबाँग डॉट कॉमवर वापरले जात आहे.

याशिवाय एखाद्या दुकानात येणारा ग्राहक किती वेळा या दुकानात आला आहे, त्याची आवड काय आहे, त्याच्यासाठी कोणत्या ऑफर्स उपलब्ध करून देता येऊ शकतील असे एक ना अनेक पर्याय दुकानदाराला उपलब्ध करून देण्यासाठी एका विशेष यंत्रणेची निर्मिती करण्यात आली आहे. याचबरोबर आभासी विश्वात मुलाखत घेऊन निवडलेल्या उमेदवाराला नेमणूकपत्र देणारी यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. ही यंत्रणा सध्या विविध कंपन्या वापरात आहेत. याशिवाय कार्यालयात बसून कंपनीतील उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यापासून ते उत्पादन बाजारात जाईपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा असलेले अ‍ॅपही विकसित करण्यात आले असून ते भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे.