शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा भाऊ मिखाईलच्या खुनाचाही कट होता, असे तपासात समोर आले आहे. मिखाईलने मुंबई पोलिसांना प्रथम याबाबत कळवले होते. त्यानंतर शनिवारी संजीव खन्नानेही मिखाईलला मारण्याची योजना होती हे कबूल केले आहे.
मिखाईल आणि शीना ही दोघे इंद्राणीचे मुले. परंतु इंद्राणी त्यांना लहानपणापासून सोडून मुंबईला आली होती. शीनाची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या करण्यात आली. त्यानंतर मिखाईलचाही काटा काढायचा होता. मिखाईलने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार त्याला इंद्राणीने एप्रिल २०१२ मध्ये गुवाहाटी येथे बोलावून घेतले. त्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे त्याला चक्कर आली. काही तरी विपरीत घडणार असल्याची कुणकुण त्याला लागली आणि तो तेथून निसटला. त्यानंतर तो पुन्हा कधीच मुंबईत परतला नव्हता. मिखाईलने दिलेल्या या माहितीची सत्यता पोलीस पडताळून पाहत आहेत. शीनाच्या हत्येच्या वेळी मिखाइल मुंबईत होता त्यामुळे त्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे. दरम्यान, संजीव खन्ना यानेही मिखाइलच्या हत्येची योजना होती, असे पोलिसांना चौकशीत सांगितले आहे.