पालिका सभागृहाची परवानगी; आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

मजल दरमजलाचा टप्पा कळावा, या हेतून ब्रिटिशांनी मुंबईत टप्प्याटप्प्यावर मैलाचे दगड उभे केले. मात्र, गेल्या काही वर्षांत मुंबईत झालेल्या विकासकामांमध्ये हे दगड लुप्त होऊ लागले आहेत. त्यामुळे मैलाच्या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा देऊन त्यांचे जतन करण्यावर पालिका सभागृहाचे एकमत झाले असून त्यास पालिका सभागृहाने मंजुरीही दिली आहे. आता या प्रस्तावाला पालिका आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मात्र त्यास केवळ आयुक्तांच्याच नव्हे तर पुरातन वास्तू जतन समितीच्याही परवानगीची आवश्यकता आहे.

ब्रिटिशांनी मुंबईमध्ये अनेक वास्तू उभ्या केल्या. तसेच मुंबईतील अंतराचा टप्पा कळावा म्हणून ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी विशिष्ट आकाराचे मैलाचे दगडही उभे केले. ब्रिटिशांनी उभारलेल्या अनेक वास्तूंना पुरातन वास्तूचा दर्जा देण्यात आला असून त्यांचे जतन केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. तसेच रस्त्यांचीही मोठय़ा प्रमाणावर कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे काही ठिकाणचे मैलाचे दगड काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

आजही काळबादेवी, ताडदेव, परळ, दादर, भायखळा, माझगाव आदी परिसरात मैलाचे दगड दृष्टीस पडतात. परंतु, देखभालीअभावी त्यांची दैना झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील मैलाच्या दगडांचा शोध घ्यावा, त्यांना पुरातन वास्तूचा दर्जा द्यावा आणि त्यांचे जतन करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली. केवळ मैलाचे दगडच नाही, तर जतन करण्याजोग्या मुंबईतील अनेक वास्तू आजघडीला दुर्लक्षित आहेत. त्या सर्वाचेच जतन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावेळी केली. मुंबईच्या इतिहासात मैलाच्या दगडांनाही महत्त्व असल्याचे लक्षात घेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाच्या सूचनेला एकमताने पाठिंबा दिला आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही ठरावाची सूचना मंजूर केली. आता ही ठरावाची सूचना पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनी या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिल्यानंतर मैलाच्या दगडांच्या जतनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

पुरातन वास्तू जतन समितीचीही मंजुरी आवश्यक

मुंबईतील मैलाच्या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा देण्यासाठी केवळ पालिकेची परवानगी पुरेशी नाही. त्यासाठी पुरातन वास्तू जतन समितीच्या परवानगीचीही आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर मैलाच्या दगडांना पुरातन वास्तूचा दर्जा देण्याबाबत परवानगी मिळावी यासाठी याबाबतचा प्रस्ताव पुरातन वास्तू जतन समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.