नामांकित ब्रॅण्डच्या पिशव्या कापून त्यात भेसळयुक्त दूध भरणाऱ्या टोळ्यांवर छापे टाकून अन्न व औषध प्रशासनाने ९३५ लिटर दूध जप्त केले. हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.  
मालाड पूर्व येथील पठाणवाडीमध्ये नामांकित ब्रॅण्डच्या पिशव्यांमधील दुधात भेसळ करताना एकाला पकडण्यात आले. त्याच्याकडील ७ हजार ४८६ रुपये किमतीचा १९७ लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. त्यातील दोन नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. वर्सोवा लिंक रोड येथेही अमूल, गोकुळ, गोवर्धन, महानंदा अशा ब्रॅण्डच्या पिशव्यांमध्ये भेसळ करण्यात येत होती. येथील पाच नमुने तपासणीसाठी पाठवले गेले असून १०५ लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही घटनांची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यांत नोंदवण्यात आली. यासोबतच दूध भेसळीच्या संशयावरून एका वाहनातील ६३४ लिटर दूधसाठा ताब्यात घेण्यात आला. वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या दहा छाप्यांमध्ये ९३५ लिटर दूध जप्त करण्यात आले.
ठाण्यातही चार दूधविक्री केंद्रांवर छापे टाकून दुधाचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले. पुणे, सातारा व सांगली जिल्ह्य़ांत १२ दूधविक्री केंद्रांवरून २२ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. सांगली येथील एका डेअरीत १ हजार ८७९ किलो सायीचा साठा अस्वच्छ ठिकाणी आढळला.