नव्या अधिसूचनेनुसार मुंबईत आणखी २० हजार घरे?

संपामुळे देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जागेवरील प्रकल्पात मुंबईतच घरे देण्याचे दाखविलेले आमिष प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. गिरणी कामगारांसाठी तूर्तास फक्त दीड ते दोन हजार घरेच मुंबईत उपलब्ध होणार आहेत.

नव्या अधिसूचनेमुळे गिरणी कामगारांसाठी तब्बल ५० ते ६० एकर भूखंड उपलब्ध होणार असल्यामुळे आणखी १५ ते २० हजार घरे मुंबईतच मिळतील, अशी आशा गिरणी कामगार कृती समितीला आहे.

याबाबत गृहनिर्माण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत यापुढे फार तर दीड ते दोन हजार घरेच उभी राहू शकणार आहेत. आतापर्यंत १५ हजार १३० गिरणी कामगारांना वा त्यांच्या वारसांना घरे मिळाली आहेत. ४६ गिरण्यांच्या भूखंडाबाबत शासनाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार गिरणी कामगारांसाठी १६ हजार ५०० घरे उभारण्यात येणार होती. त्यापैकी १५ हजार १३० घरे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यापैकी ६० टक्क्य़ांहून अधिक घरांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती या वर्षअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबईत एकूण ५८ गिरण्या होत्या. यापैकी ११ गिरण्यांच्या भूखंडाबाबत म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही. उर्वरित ४७ गिरण्यापैकी दहा गिरण्यामध्ये म्हाडाच्या वाटय़ाला एकही भूखंड आला नाही. आरक्षण वगळून उर्वरित भूखंडाच्या एक तृतीयांश भूखंड म्हाडाला मिळत होता. परंतु नव्या अधिसूचनेनुसार संपूर्ण भूखंडाच्या एक तृतीयांश भूखंड मिळणार असल्यामुळे किमान ५० ते ६० हजार एकर भूखंड उपलब्ध होऊ शकतो. त्यावर १५ ते २० हजार घरे उभी राहू शकतील, असे कृती समितीचे म्हणणे आहे.

  • काहीही भूखंड ताब्यात न मिळालेल्या गिरण्या : मॉडर्न, कमला, खटाव, फिनिक्स, कोहिनूर नं. १ व २, पोद्दार, मफतलाल नं. १ व २, मुकेश टेक्स्टाईल.
  • पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजुरी नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित नसलेल्या गिरण्याची यादी : दिग्विजय, फिनले, गोल्डमोहर, इंडिया युनायटेड मिल नं. १, ५ व ६, न्यू सिटी, पोद्दार प्रोसेसर (एडवर्ड) आणि टाटा (सर्व राज्य वस्त्रोद्योग मंडळाच्या गिरण्या), ब्रॅडरी आणि रघुवंशी.
  • गिरणी कामगारांना प्रत्यक्ष ताबा : ९५८२ कामगार किंवा वारस; प्रगतिपथावरील कामे : श्रीनिवास मिल – ४७३; बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) आणि बॉम्बे डाईंग, लोअर परेल – ३२८२
  • ताबा मिळालेल्या; परंतु कार्यवाही न झालेल्या गिरण्या : मातुल्य, मफतलाल, हिंदुस्तान मिल युनिट १, २ व ३, व्हिक्टोरिया वेस्टर्न इंडिया, न्यू ग्रेट ईस्टर्न – ५६४.
  • भूखंडाचा अद्याप ताबा न मिळालेल्या गिरण्या : हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस – १००; इंडिया युनायटेड नं. ४ – ३१; जाम – २७३; मधुसूदन – ६७२; सीताराम -१५३.