राज्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांचा दुष्काळ असतानाही गेल्या दहा वर्षांपासून मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक म्हणून मंत्रालयात ठाण मांडून बसलेल्या सुमारे डझनभर डॉक्टरांना त्यांच्या मूळ विभागात परत धाडण्यात आले आहे. त्यामुळे आजवर मंत्र्याची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांना आता जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे मूळ कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका मंत्र्यांबरोबरच या डॉक्टरांनाही बसला आहे. आघाडीतील मंत्र्यांच्या सर्व सुविधा आणि कार्यालये काढून घेण्यात आली आहेत तसेच त्यांच्या स्वीय साहाय्यकांना त्यांच्या मूळ विभागात धाडण्यात आले आहे. त्यामुळे जनावरांची सेवा करण्याच्या आपल्या मूळ कर्तव्यापासून पळून गेल्या १० वर्षांपासून मंत्र्यांच्या आसऱ्याला बसलेल्या डझनभर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आता जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एरवी निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहिता असली तरी आपल्या मंत्रिपदाच्या आडून सरकारी यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेणाऱ्या मंत्र्यांची सर्व व्यवस्था राष्ट्रपती राजवटीपायी गेल्याने त्यांना धक्का बसला असून अनेकांनी बंगल्यांवर खासगी सुरक्षा यंत्रणा आणि कार्यकर्त्यांना बसविले आहे. केंद्रातील सत्तांतरानंतरही खासदार आणि मंत्र्यांनी बंगले खाली करण्यास विलंब लावल्यामुळे नवनिर्वाचित खासदारांना घरे देताना केंद्र सरकारची चांगलीच कोंडी झाली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच सर्व मंत्र्यांना त्यांची कार्यालये आणि निवासस्थाने रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयासह सर्वच मंत्र्यांनी मंगळवारी आपली दालने रिकामी केली. मात्र काही मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये उशिरापर्यंत दप्तर हलविण्याचे काम सुरू होते. मंत्र्यांना निवासस्थान रिकामे करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर भाडे आकारले जाईल.

या डॉक्टरांना धक्का..
ज्या डॉक्टरांना परत पाठविण्यात आले आहे, त्यामध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे विशेष कार्याधिकारी डॉ. अनिल महाजन यांच्यासह महेश कुलकर्णी (सुनील तटकरे), भूपेंद्र बोधनकर (जयदत्त क्षीरसागर), सुनील पवार (मधुकर चव्हाण), राजेश कवळे (रणजित कांबळे), संजय धोटे (अनिल देशमुख), अमर भडांगे (सुरेश शेट्टी), नंदा गवळी (नितीन राऊत), देशमुख (सतेज पाटील) यांच्यासह अब्दुल सत्तार आणि हर्षवर्धन पाटील यांच्याही दोन डॉक्टर स्वीय साहाय्यकांना परत पाठविण्यात आले आहे.