शिक्षक संघटनांची साहित्य संमेलने आणि वार्षिक अधिवेशनांकरिता ‘शाळा बंद’चे फर्मानच शिक्षकांचे नेते म्हणवून घेणाऱ्या नेत्यांकडून निघाली आहेत. मुंबईत १४ फेब्रुवारीला ‘शिक्षक भारती’च्या सहकार्याने आणि ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’ यांचे अनुक्रमे साहित्य संमेलन आणि वार्षिक अधिवेशन होणार आहे.
 या अकारण सुट्टय़ांचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याने आयोजकांनी एप्रिल महिन्यात शाळेला सुट्टी असताना ही संमेलने किंवा अधिवेशने भरवावीत, अशी मागणी आता पुढे येत आहे.
या संमेलनांकरिता शाळेमधील बहुतांश शिक्षक हजेरी लावू इच्छित असतील तर त्या दिवशी शाळेला सुट्टी घोषित करण्यात यावी, असे विनंतीवजा आदेश देणारे पत्रक बहुतेक अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले आहे.
सरकारी परिपत्रकाचा कुठलासा कागद चिटकवून ही पत्रके शाळेला पाठविली जातात. या शिवाय संबंधित नेत्याची नाराजी नको म्हणून शाळाही शिक्षकांची संख्या पाहून सुट्टी घोषित करतात. परंतु, आता हे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत, अशी भावना एका मुख्याध्यापकाने व्यक्त केली.
‘या प्रकाराचा फटका प्रामुख्याने अनुदानित शाळांना बसतो. अशा संमेलनांचा फायदा संघटना आपला राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी करत असते. अशी संमेलने एप्रिलमध्ये शाळा सुरू नसताना भरवावीत,’ अशी सूचना आणखी एका मुख्यध्यापकांनी केली.

विद्यार्थ्यांचे नुकसान नाही!
एप्रिल-मे महिन्यात शिक्षकांना पेपर तपासणी, परीक्षा आदी कामे असल्याने हे अधिवेशन त्या काळात घेणे शक्य होत नाही. शनिवारी हे अधिवेशन घेतल्याने पाचच तासिका बुडण्याची शक्यता आहे.
– अनिल बोरनारे, अध्यक्ष शिक्षक परिषद, मुंबई विभाग

साहित्याची रूची वाढवण्यासाठी संमेलन !
शिक्षक साहित्य संमेलनाबाबत कोणतेही पत्रक शिक्षक भारतीतर्फे काढण्यात आलेले नाही.शिक्षकांमध्ये भाषा आणि साहित्य यांबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी हे संमेलन घेत असतो. मात्र विनंतीवजा आदेश देण्यात आलेले नाहीत.
– कपिल पाटील, आमदार शिक्षक भारती