पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांचे आदेश
काळीमा सुसंस्कृततेला!
महिलांविरुद्ध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करू नका. अशाच एखाद्या प्रकरणातून महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण घडू शकते, असे स्पष्ट करीत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी अशा गुन्ह्य़ांची तातडीने दखल घेण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना केल्या आहेत. निदान भविष्यात काही प्रमाणात तरी अशा घटना त्यामुळे टाळता येऊ शकतील, असे डॉ. सिंग यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
दादर पूर्वेला भरदिवसा अचानक घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजणे साहजिक आहे. परंतु अशाही अवस्थेत आरोपीला पकडून गंभीर जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता मुंबईकरांनी दाखविल्याबद्दल आयुक्तांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे. यामुळेच संबंधित दुर्दैवी तरुणीचा जीव वाचू शकला, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरोपीकडे कोयता असतानाही धाडस दाखवून त्याला पकडले. अशा मुंबईकरांमुळे गुन्ह्य़ांना आळा बसू शकतो. दादरमधील घटना अनपेक्षित होती. परंतु काही अपेक्षित घटना टाळता येण्यासारख्या आहेत. त्यामुळेच महिलांबाबत असलेल्या अदखलपात्र गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष करू नका, असे आपण नेहमी सांगत असतो. आताही त्याचीच पुनरावृत्ती केली आहे. छेडछाड वा हुंडाबळीच्या घटनांना त्यामुळे काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.