नवी मुंबईतील ऐरोली येथून काही दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या फ्रान्सिला फ्रॉन्सिको या आठ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली असून, पोलीसांना शुक्रवारी सकाळी मीरारोड-घोडबंदर परिसरात तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी तिच्या नातेवाईकांपैकी क्लॅरेन्स या व्यक्तीला अटक केली आहे. क्लॅरेन्स हा फ्रान्सिलाच्या मावशीचा पती असून, त्याने कौटुंबिक वादातून गळा दाबून फ्रान्सिलाची हत्या केल्याचा पोलीसांना संशय आहे. फ्रान्सिला फ्रॉन्सिको ऐरोलीच्या सेक्टर आठमधील एकविरा दर्शन सोसायटीत राहत होती. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळून बेपत्ता झाली. तेव्हापासून पोलीस या मुलीचा शोध घेत होते.
नेहमी सेक्टर १९ मधील न्यू हॉरायझन शाळेतून संध्याकाळी सव्वासहा वाजता घरी परतणारी फ्रान्सिला सोमवारी रात्री उशिरापर्यंत न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलीच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके नेमली होती.