सोळा वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे चेंबूर येथे उघडकीस आली. एका रिक्षाचालकाने माहिती दिल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींना अटक केली.
बुधवारी रात्री चेंबूर- टिळक नगर जवळील पेस्तम नगरातील एका लॉटरी केंद्रामध्ये काही तरी संशयास्पद प्रकार सुरू असल्याचे एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले. त्याने गस्तीवरील पोलिसांना ही माहिती दिली.
टिळक नगर पोलिसांनी या ठिकाणी मध्यरात्री अडीचच्या सुमारास धाव घेतली. पोलीस घटनास्थळावर पोहोचले तेव्हा हे नराधम तरुणीवर अत्याचार करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तरुणीला मद्य पाजून तिच्यावर त्या तरुणांनी बलात्कार केला. याबाबत माहिती देताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे यांनी सांगितले की, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण चेंबूर भागात राहणारे आहेत. तरुणी आरोपींपैकी एकाच्या परिचयाची होती.
मंगळवारी रात्री त्या तरुणाने तिला पार्टी करण्याच्या निमित्ताने बोलावले. त्याने आपल्या पाच मित्रांना बोलावून घेतले होते. या पैकी दोन मित्र या लॉटरी केंद्रात काम करीत होते. तेथेच त्यांनी पार्टीचे निमित्त करून तिला बोलावले. रात्री ११ वाजता पीडित मुलगी घरातून बाहेर पडली होती.
ती लॉटरी केंद्रात पोहोचल्यावर तिला भरपूर मद्य पाजण्यात आले आणि मग तिच्यावर बलात्कार करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे जप्त केली आहेत. पीडित तरुणीला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व आरोपींविरोधात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक कायदा (पोक्सो) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत.