वडाळा येथे वडिलांच्या मिठाईच्या दुकानाबाहेर खेळणाऱ्या शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री काही अज्ञात इसमांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. रुग्णालयात दाखल करण्यात आलेली पीडित मुलगी घाबरली असून तिच्याकडून फारशी माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे तपास अवघड बनला आहे.
वडाळा येथील हिम्मत नगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पीडित मुलीच्या वडिलांचे शांती नगरमध्ये मिठाईचे दुकान आहे. सायन कोळीवाडा येथील शाळेत चौथीमध्ये शिकणारी ही मुलगी शुक्रवारी आपल्या वडिलांबरोबर दुकानात गेली होती. रात्री नऊच्या सुमारास मिठाई घेण्यासाठी अनेक गिऱ्हाईके दुकानात आल्यामुळे तिचे वडील कामात व्यस्त होते. त्याच वेळी मुलगी दुकानाबाहेर इतर मुलांबरोबर फटाके फोडत होती. रात्री १२ च्या सुमारास दुकान बंद करून वडील घरी निघाले. मात्र त्यावेळी त्यांना आपली मुलगी कुठेच दिसली नाही. त्यांनी शोधाशोध केली. परंतु ती कुठेच आढळली नाही. तसेच इतर मुलेही तेथे नव्हती. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याच वेळी रात्री १ च्या सुमारास मुलगी परत येताना त्यांना आढळली. तिच्या कपडय़ांवर रक्ताचे डाग पडले होते. तसेच चेहराही मातीने माखला होता. घाबरलेल्या अवस्थेत ती प्रचंड रडत होती. तिला काहीच सांगता येत नव्हते. अखेर तिचे वडील तिला घेऊन वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी तक्रार केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी तिला खोदूनखोदून माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र मानसिक धक्का बसलेल्या या मुलीला काहीच सांगता येत नव्हते. अखेर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे ती थोडीफार धक्क्य़ातून सावरल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
मुलीला आरोपींच्या चेहऱ्याविषयी नीटशी माहिती देता आली नाही. मात्र ते उंच होते आणि एकाने काळी पॅन्ट आणि निळा शर्ट घातला होता, अशी माहिती तिने दिली. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यातील अधिकारी, तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपींचा तपास करीत आहेत.