कारशेडमध्ये जाणाऱ्या गाडीत अनवधानाने चढलेल्या काही प्रवाशांनी विक्रोळी स्थानकात या गाडीचा वेग कमी होताच मंगळवारी सकाळी प्लॅटफॉर्मवर उडय़ा मारल्या. सुदैवाने या घटनेत एका महिला प्रवाशाला किरकोळ खरचटण्याशिवाय काहीही दुखापत झाली नाही. प्रवाशांच्या मते ही गाडी कारशेडमध्ये जात असल्याची कोणतीही उद्घोषणा रेल्वेतर्फे करण्यात आली नाही. मात्र, कारशेडमध्ये जाणाऱ्या प्रत्येक गाडीबाबत उद्घोषणा केली जाते, असा दावा मध्य रेल्वेने केला.

सकाळी ११.३०च्या सुमारास कुर्ला स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकला आलेली रिकामी गाडी पाहून या गाडीत १५-२० प्रवासी चढले. मात्र, ही गाडी विद्याविहार व घाटकोपर येथे न थांबता कमी वेगाने निघाल्यावर विक्रोळी स्थानकात गाडीचा वेग कमी झाल्यावर या प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर उडय़ा टाकल्या. ही रिकामी गाडी कारशेडमध्ये जात असल्याची कोणतीही उद्घोषणा रेल्वेने केली नव्हती, असा दावा प्रवाशांनी केला.मात्र, कारशेडमध्ये जाणाऱ्या प्रत्येक गाडीबाबत उद्घोषणा केली जाते. त्यामुळे प्रवाशांचा हा दावा फोल आहे, असे मत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केला.