घाटकोपरमधील बेपत्ता तरुणाची हत्या
प्रतिनिधी, मुंबई
घाटकोपर पूर्वेच्या पंतनगर येथील रेल्वे मुख्यालयाजवळच्या एका इमारतीत मंगळवारी सकाळी एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. दीपेश मेहता (२०) असे या तरुणाचे नाव असून तो १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता.
दीपेश रमाबाई आंबेडकरनगरातील नम्रता चाळीत राहत होता. १३ नोव्हेंबरपासून तो अचानक बेपत्ता झाला होता. पंतनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली होती. दीपेशचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तिच्या कुटुंबीयांकडून या प्रेमसंबंधाला विरोध होता. तेच कारण या हत्येमागे असल्याचा संशय दीपेशच्या भावाने व्यक्त केला आहे. पंतनगर पोलीस आणि गुन्हे शाखा ७ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

‘चार आठवडय़ांत सीसीटीव्ही लावा’
मुंबई : कोठडी मृत्यूंना आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रत्येक खोलीत आणि अगदी वरांडे व मोकळ्या जागांवर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी दिले होते, मात्र तीन महिने उलटल्यानंतरही आदेशाची अंमलबजावणी तर दूर, पण नवीन सरकार नुकतेच स्थापन झाल्याचे सांगत वेळ मागून घेण्यात आल्याने उच्च न्यायालयाने सरकारला चार आठवडय़ांचा वेळ देत ही शेवटची संधी असल्याचे बजावले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या १५ वर्षांत देशभरात कोठडीत झालेल्या  मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजेच तब्बल २३.४८ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाल्यावर त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिले.