लाखो प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरळीत होण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा पाच व सहाव्या मार्गिकेच्या कामात मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी खोडा घातला. रेल्वे रुळांलगतच्या संरक्षण भिंतीमुळे पावसाचे पाणी साचून शेकडो घरे जलमय होतील, असा आरोप करीत आव्हाड यांनी हे काम बंद पाडले.
सुमारे ५०० रहिवाशांच्या जमावासह रस्त्यावर उतरून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रेल्वे रुळावर काम करणाऱ्या मजुरांनी तेथून पळ काढला. आधीच अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील, अशी प्रवाशांची अपेक्षा असताना आव्हाड आणि स्थानिकांच्या या भूमिकेमुळे ही मार्गिका आता रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अपुऱ्या रेल्वे रुळांच्या संख्येमुळे उपनगरीय रेल्वे गाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळत असून त्यामुळे अनेक प्रवाशांचे बळी जाऊ लागले आहे. दिवा ते ठाणे या दरम्यान मृतांची संख्या मोठी असून या भागात पाचव्या व सहाव्या रुळांचे काम जलद होण्याची गरज निर्माण झाली आहे. लाखो प्रवाशांच्या सुरळीत, सुरक्षित आणि विनाअडथळा प्रवासासाठी महत्त्वाची ही मार्गिका वेगवेगळ्या कारणांमुळे रखडत आहे. आता येथील रहिवाशांच्या विरोधामुळे ही मार्गिका रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कळवा ते मुंब्रा दरम्यान रेल्वे रुळांलगत मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी आहे.
त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात रूळ ओलांडण्याच्या घटना घडत असून रहिवाशांसाठी हा परिसर धोकादायक ठरू लागला आहे. हे रोखण्यासाठी रेल्वेच्या वतीने रेल्वे रुळांलगत संरक्षक भिंत उभारण्याचे काम केले जात आहे. या भिंतीमुळे पावसाचे पाणी अडवले जाणार असून ते पाणी लोकांच्या घरामध्ये घुसण्याची शक्यता आहे. हे पाणी निचरू शकेल, अशी व्यवस्था रेल्वेने उभारलेली नाही, असा आरोप करीत आव्हाड यांनी या परिसरात सुरू असलेले काम बंद पाडले. या प्रकरणी आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना काम बंद पाडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून सुमारे दीड लाख रहिवाशांना या कामामुळे त्रास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रहिवाशांचा येण्या-जाण्याचा मार्ग या साठणाऱ्या पाण्यामुळे बंद होणार असून त्यामुळेच हे काम बंद पाडल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.