वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले भाजपचे प्रतोद आमदार राज पुरोहित यांनी पक्षाकडून आपल्याला नोटीसच मिळाली नसल्याचा दावा केला आहे. ती कथित ‘सीडी’ही आपण अजून पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. पण तरीही तो बनावट असल्याचा दावा पुरोहित यांनी केला आहे. पक्षाने काही आक्षेप घेतल्यास त्याबाबत आपण स्पष्टीकरण देऊ, असे पुरोहित यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ भाजप नेते यांच्याबाबतच्या पुरोहित यांच्या कथित वक्तव्यांमुळे भाजपमध्ये खळबळ माजली आहे. पुरोहित यांना पक्षाने स्पष्टीकरण करण्यासाठी नोटीस दिली असून तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. ही मुदत सोमवारी संपली. या संदर्भात विचारता आपण देवदर्शनासाठी दिल्ली, मथुरा, वृंदावन परिसरात असल्याचा दावा पुरोहित यांनी केला. पण ते मुंबईत आले असून ते प्रदेश कार्यालयातही येऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले. पुरोहित यांनी दिल्लीत जाऊन काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याचे समजते.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्यासाठी सर्वस्व असून ती सीडी बनावट आहे. स्टुडिओमध्ये तयार केली आहे. जर माझे काही चुकले असेल, तर मी पक्षाची माफी मागेन.
-राज पुरोहित, भाजप आमदार