देशातील एकूणच राजकारणाचा बदलता बाज आणि पुढील निवडणुकीनंतर सत्ता मिळण्याबाबत असलेली साशंकता त्यातूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमधील अस्वस्थता राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाली. पुन्हा निवडून येण्यासाठी दोन्ही काँग्रेसमधील काही आमदारांना त्यातूनच भाजपचे वेध लागले आहेत.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची तब्बल १२ मते भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यसंख्येएवढीही मते काँग्रेसच्या उमेदवार मीराकुमार यांना राज्यातून मिळाली नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या गोटातून नेहमीच करण्यात येतो. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत झालेली मतांची फाटाफूट लक्षात घेता भाजपच्या दाव्यात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मते फुटल्याबाबत कानावर हात ठेवले असले तरी दोन्ही काँग्रेसची मते फोडण्यात भाजपला यश मिळाले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही आमदारांना पुन्हा निवडून येण्याबाबत साशंकता वाटते. भाजपमध्ये प्रवेश केल्यास निवडून येऊ शकतो, असे शहरी भागातील आमदारांचे मत आहे. शहरी भागांत भाजपला पाठिंबा मिळत असल्याचे लोकसभेपासून ते महानगरपालिका निवडणुकांपर्यंत चित्र बघायला मिळाले. काँग्रेस आमदारांना पक्षाच्या भवितव्याबाबत चिंता वाटते. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत असलेल्या मर्यादा लक्षात घेता काँग्रेसला पुढील निवडणुकीत कितपत यश मिळेल याची नेतेमंडळींनाच खात्री नाही. वर्षांनुवर्षे सत्ता उपभोगलेल्या प्रस्थापित नेत्यांना पुढील निवडणुकीनंतर सत्ता मिळण्याबाबत असलेली साशंकता अस्वस्थ करते. त्यातूनच भाजपची वाट पत्करण्याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही नेतेमंडळी पर्याय अवलंबून बघत आहेत.

पुढील निवडणुकीनंतर स्वबळावर सत्तेत येण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यातूनच विरोधी पक्षातील निवडून येऊ शकतात, अशा बडय़ा नेत्यांना गळाला लावण्याचे भाजपचे धोरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी पुढील निवडणुकीकरिता भाजपमध्ये उमेदवारी निश्चित करून ठेवली आहे, हे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानही बरेच बोलके आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या भाजपप्रवेशाची आता औपचारिकता शिल्लक असल्याचे भाजपमधूनच सांगण्यात येते. काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही माजी मंत्र्यांकडे संशयाने बघितले जाते.

भाजपकडून नेहमीच फोडाफोडीचे राजकारण केले जाते. हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. याचे मत फुटले, त्याचे मत फुटले, असा उगाचच संशय कोणाविरुद्ध व्यक्त केला जाऊ नये. शेवटी मतदान गुप्त असते. आमची मते फुटली नाहीत, असे सांगत राष्ट्रवादीने काँग्रेसबद्दल संशय व्यक्त करू नये. आम्ही आमचे बघून घेऊ.

– अशोक चव्हाण, खासदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष