‘मेट्रो-३’ प्रकल्पामुळे गिरगाव, काळबादेवीतील एकाही रहिवाशाला विस्थापित होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या (एमएमआरसी)च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची मनधरणी केली, मात्र या परिसरातील काही तज्ज्ञ मंडळींबरोबर एमएमआरसीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीनंतर शिवसेना पुढील व्यूहरचना निश्चित करणार आहे. बैठकीत तोडगा निघाला नाही, तर येत्या १८ मार्च रोजी शिवसेनेकडून ‘गिरगाव बंद’ची हाक देण्यात येणार आहे.
अश्विनी भिडे यांनी रविवारी ‘मातोश्री’ गाठून उद्धव ठाकरे यांना ‘मेट्रो-३’ प्रकल्प समजावून सांगितला. रहिवाशी विस्थापित होण्याच्या भीतीमुळे ‘मेट्रो-३’ प्रकल्पातील गिरगाव, काळबादेवी स्थानके वगळावीत, प्रकल्पाचा मार्ग बदलावा अथवा याच भागात रहिवाशांचे पुनर्वसन करावे, असे पर्याय या वेळी अश्विनी भिडे यांच्यासमोर मांडण्यात आले. दरम्यान, प्रकल्पासाठी पाडण्यात येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांचे शक्यतो याच भागात पुनर्वसन करण्यात येईल, असेही अश्विनी भिडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
या विभागातील रहिवाशांचे समाधान होईपर्यंत ‘मेट्रो-३’ला शिवसेनेचा विरोध कायम राहील. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी गिरगावकरांचे समाधान करावे, असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
‘मेट्रो-३’बाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, काही तज्ज्ञ मंडळी आणि एमएमआरसीचे अधिकारी यांची सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास नरिमन पॉइंट येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्याबरोबर चंद्रशेखर प्रभू, विजय कबरे, विरेन वसा आदी मान्यवरही बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या तज्ज्ञ मंडळींचे समाधान झाल्यानंतर चिराबाजार येथील शिवसेनेच्या दक्षिण मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी सायंकाळी रहिवाशांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.