भारतात आयोजित होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा दाखला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणेंवर थेट नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आगामी फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रसिद्धीसाठी भाजप सरकारकडून फुटबॉलचे वाटप करण्यात येते आहे. पण  सिंधुदुर्गमध्ये पहिली किक काँग्रेसने मारली. आणि आता दोन्ही नेटमधले गोली म्हणतात माझ्याकडे बॉल नको, असे सांगत त्यांनी राणेंच्या सध्याच्या अवस्थेवर सूचक टिप्पणी केली.

मुंबईत फेसबुक पेजच्या अनावरणाच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. नारायण राणे हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चेनंतर त्यांना शिवसेनेकडून ऑफर मिळाली होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण या केवळ चर्चा आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आदेश धुडकावून आपल्या नेतृत्वाखाली कोकणात समांतर काँग्रेस निर्माण करण्याची खेळी राणे यांच्याकडून खेळली जात असल्याचे दिसते आहे.

मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करते. फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबवण्यात आलेल्या ‘मिशन वन मिलियन’ उपक्रमावरही त्यांनी टीका केली. योगानंतर आता सरकारला फुटबॉलचा फिव्हर चढल्याचे ते म्हणाले. सहा ऑक्टोबरपासून भारतामध्ये प्रथमच फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. त्याचा प्रसार व प्रचारही जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉलसाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे म्हणून सरकारने ‘मिशन वन मिलियन’ उपक्रम हाती घेतला आहे.