राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचेही पक्षांतर; फोडाफोडीचे राजकारण
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले मनसेचे नगरसेवक ईश्वर तायडे, अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. तायडे आणि तांडेल हे दोघेही भाजपच्या वाटेवर होते. मात्र शिवसेनेने त्यांना पत्रात प्रवेश देत आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये उमेदवारांचा शोध घेत असलेल्या भाजपला धक्का दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडून मिळालेल्या अर्थसंकल्पीय निधीतून भाजपने ईश्वर तायडे यांना निधी दिला होता. त्याच वेळी ईश्वर तायडे भाजपच्या गोटात सामील होत असल्याचे संकेत मिळाले होते. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांना भाजपने पाठिंबा दिला होता. त्या वेळी प्रसाद लाड यांच्यासाठी विजय तांडेल जोरदार मोर्चेबांधणी करीत होते. विजय तांडेल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. पालिका निवडणुका जवळ आल्यानंतर तायडे, तांडेल हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. शिवसेनेने या प्रकरणी भाजपला धक्का दिल्याची चर्चाही सुरू होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय गेल्या काही महिन्यांपासून तायडे आणि तांडेल यांच्या संपर्कात होते. अखेर शुक्रवारी या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी शिवसेनेत दाखल झाले. शरद पवार यांच्या पत्नी नगरसेविका सविता पवार यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. पक्षांतर बंदी कायद्याच्या भीतीपोटी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसावा असे राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी सांगितले.