माहीमच्या प्रभाग क्रमांक १८१ च्या नगरसेविका श्रद्घा पाटील आणि त्यांचे पती राजेश पाटील यांना गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधात्मक खात्याने अटक केली. पालिकेचे स्वच्छता प्रबोधन अभियान राबविणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या चालकाकडून लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फिर्यादीच्या स्वयंसेवी संस्थेला पालिकेच्या ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन’ अभियानांतर्गत काम मिळाले होते. बेरोजगार तरुणांना या संस्थेमार्फत काम दिले जाते. स्थानिक नगरसेविका श्रद्धा पाटील यांचे पती राजेश पाटील यांनी हे काम करायचे असल्यास दहा हजार रुपयाचा मासिक हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी संस्था चालकाला केली होती. हप्ता न दिल्यास कंत्राट रद्द करण्याची धमकीही पाटील देत होते. त्याप्रमाणे नगरसेविका श्रद्धा पाटील यांनी पालिकेत ही संस्था योग्य काम करत नसल्याची तक्रारही दिली होती. शेवटी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरूवारी सापळा लावून १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना राजेश पाटील यांना अटक करण्यात आली. नंतर गुन्हा दाखल करून श्रद्धा पाटील यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.