एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे काढलेल्या ‘संताप मोर्चा’त रेल्वे पूल तसेच रेल्वेमार्गालगतच्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत उद्या संपत असून त्यानंतर या फेरीवाल्यांना आता मनसेच्या ‘कारवाई’ला सामोरे जावे लागणार आहे. मनसेचा फेरीवाल्यांविरोधातील ‘एल्गार’ उद्यापासून दिसेल असे मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

मनसेचे मुंबईकरांचा संताप मोर्चा पाच ऑक्टोबर रोजी मेट्रो ते चर्चगेट असा काढला होता. राज ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर या मोर्चाचे सभेत रुपांतर होऊ राज यांनी केलेल्या भाषणात पंधरा दिवसात रेल्वे पूल तसेच रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वार परिसरात असलेल्या फेरीवाले हटविण्याची मुदत दिली होती. या काळात फेरीवाले हटवले नाही तर सोळाव्या दिवशी मनसे या फेरीवाल्यांना हटवेल व यातून निर्माण होणाऱ्या संघर्षांला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा इशारा राज यांनी दिला होता. राज यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वे पुलांवरील तसेच फेरीवाले काही दिवस गायब झाले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरातून  अदृश्य झालेल्या फेरीवाल्यांनी दिवाळीच्या तोंडावरच पुन्हा आपले बस्तान बसविले.

चर्चगेट तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस भुयारी रेल्वे मार्गातही फेरीवाल्यांनी आपले हातपाय पसरले होते. दिवाळीच्या तोंडावर रेल्वे तसेच महापालिकेनेही आपली कारवाई सौम्य केल्यामुळे ठाणे, डोंबिवली तसेच मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी जागा व्यापून टाकल्याचे दिसून येत आहे. दरम्यान राज यांनी मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांचीही भेट घेऊन रेल्वे स्थानक परिसराबाहेरील पदपथांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेली मुदत उद्या संपत असून त्यानंतर जर फेरीवाले दिसले तर मनसेचे कार्यकर्ते या फेरीवाल्यांवर कारवाई करतील असे मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

राज यांनी इशारा देताच रेल्वे प्रशासन कारवाई करते हे दिसून आले आहे. या कारवाईत रेल्वे व महापालिकेने सातत्य राखल्यास मनसेला कारवाई करण्याची गरज भासणार नाही. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मनसेने कारवाईला स्थगिती दिली आहे का, असे विचारले असता अशी कोणताही स्थगिती राज ठाकरे यांनी दिलेली नसून पंधरा दिवसाची मुदत संपल्यानंतर फेरीवाले दिसल्यास मनसे कोणत्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.