ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर सर्वच कार्यकर्ते कामाला लागले. मात्र महापालिका मुख्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा पंधरवडय़ा’च्या आरंभ सोहळ्याकडे मनसेच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली. इतकेच नव्हे तर २२७ नगरसेवकांपैकी महापौर, उपमहापौरांसह केवळ ११ नगरसेवक उपस्थित होते. एरवी मराठीसाठी गळा काढणाऱ्या नगरसेवकांच्या सोहळ्यातील अनुपस्थिमुळे पालिकेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ सप्टेंबर रोजी पालिकेमध्ये ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येतो. पालिका मुख्यालयात २७ सप्टेंबर रोजी मान्यवर व्यक्ती आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत ‘मराठी भाषा पंधरवडय़ा’चा आरंभ सोहळा साजरा केला जातो. पालिका मुख्यालयात शुक्रवारी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांचे व्याख्यान झाले. महापौर स्नेहल आंबेकर अध्यक्षस्थानी होत्या.