मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांच्या भविष्यातील नियुक्तीबाबत सोमवारी पालिका मुख्यालयात शिवसेनेची खलबते सुरू होती. पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात आमदार अनिल परब यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या सर्व नगरसेवकांची येत्या २७ ऑक्टोबर रोजी पालिका सभागृहात घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. तर त्याच वेळी या सहा नगरसेवकांना गट स्थापन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे पत्र मनसेच्या नेत्यांनी सोमवारी कोकण आयुक्तांना सादर केले.

मनसेला ‘रामराम’ ठोकून सहा नगरसेवकांनी शिवसेनेत सहभागी होत असल्याचे वृत्त शुक्रवारी मुंबईत पसरले आणि एकच खळबळ उडाली. सहा नगरसेवक गट स्थापन करून शिवसेनेला पाठिंबा देणार किंवा शिवसेनेत सहभागी होणार, अशी जोरदार चर्चा मुंबईत सुरू होती. मात्र मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत विलीन होत असल्याचे पत्र कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले. त्याचबरोबर या संदर्भातील कायदेशीर प्रक्रियाही शिवसेनेकडून पूर्ण करण्यात आली, असे पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

शिवसेनेत विलीन झालेल्या सहा नगरसेवकांची पालिका सभागृहात आसन व्यवस्था, वैधानिक, तसेच विशेष समित्यांमधील सदस्य संख्या आदी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पालिका मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयात सोमवारी एक बैठक पार पडली. आमदार अनिल परब यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, सभागृह नेते यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर आदी उपस्थित होते.

मनसेतून बाहेर पडलेल्या सहा नगरसेवकांच्या विलीनीकरणात कोणताही कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या बैठकीत पालिका चिटणीस विभागातील अधिकारी, विधि खात्यातील अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. पक्षात विलीन झालेल्या नगरसेवकांची घोषणा कधी करावी यावर बराच वेळ चर्चा करण्यात आली. कोकण आयुक्तांकडून अद्याप पालिका आयुक्तांना पत्र आलेले नाही. हे पत्र एक-दोन दिवसांत पालिका आयुक्तांना येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका सभागृहाच्या २७ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या बैठकीत सहा नगरसेवकांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाची घोषणा करण्यात येईल, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

गट स्थापण्यास परवानगी देऊ नका

मनसे सोडून गेलेल्या सहा नगरसेवकांना गट स्थापन करण्यास परवानगी देऊ नये, असे पत्र मनसेकडून सोमवारी कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. तांत्रिकदृष्टय़ा या सहा जणांना गट स्थापन करून शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, असे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सहा जणांना गटच स्थापन करण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. या नगरसेवकांनी एकत्रितपणे शिवसेनेत विलीनीकरण केले आहे. त्यामुळे गट स्थापन करण्याचा प्रश्नच नाही, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.