महिनाभरापूर्वी टूजी डेटाच्या भाडेदरात वाढ करणाऱ्या आघाडीची दूरसंचार सेवा प्रदाता ‘भारती एअरटेल’ने आपल्या एकंदर कॉलदरात वाढीचाही कटू निर्णय बुधवारी जाहीर केला. ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विविध प्रोत्साहन योजना आणि प्रत्येक रिचार्जवर मिळणाऱ्या मोफत मिनिटांनाही कंपनीने कात्री लावली आहे. बाजार अग्रणी एअरटेलपाठोपाठ अन्य दूरसंचार सेवांकडून दरवाढीचे पाऊल लगोलग टाकले जाणे अपेक्षित आहे.
दूरसंचार सेवा प्रदात्यांना नव्याने ध्वनिल1हरी (स्पेक्ट्रम)च्या खरेदीवर कराव्या लागलेल्या प्रचंड मोठय़ा गुंतवणुकीच्या पाश्र्वभूमीवर कॉलदरात वाढ करणे अपरिहार्य ठरले असून, त्याचे संकेत या क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या बडय़ा अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले होते. याची प्रत्यक्षात सुरुवात मोबाइल सेवेतील अग्रेसर नाममुद्रा असलेल्या ‘एअरटेल’कडून झाली आहे. भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाइल सेवा असलेल्या आयडिया सेल्युलरने गेल्याच महिन्यात देशभरात त्यांची सेवा सुरू असलेल्या काही परिमंडळात कॉलदर वाढीबरोबरच, प्रोत्साहन योजनाही मागे घेतल्या आहेत. एअरटेलने मासिक भाडेदरात काहीही फेरबदल केलेले नसले तरी नॉन-व्हॉइस तसेच प्रोत्साहनपर सवलतींना तसेच प्रत्येक रिचार्ज अथवा देयकासह प्रदान केल्या जाणाऱ्या मोफत मिनिटांमध्ये १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.