वीज पडून होणारी जीवीतहानी टाळण्यासाठी मोबाइल लाईटनिंग अ‍ॅलर्ट यंत्रणा विकसित करुन पावसाळ्यापूर्वीची कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्या.
पावसाळ्यापूर्व कामांचा आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. दरवर्षी वीज पडून जीवीत व मालमत्तेची हानी होते. पुणे येथील आयआयटीएमच्या माध्यमातून राज्यात १७ ठिकाणी बसविण्यात आलेल्या लाईटनिंग लोकेशन नेटवर्क सेंटर्सद्वारे वीज पडण्याच्या दोन तास आधी सूचना प्राप्त होऊ शकते. या सुविधेचा लाभ घेऊन जिल्हा यंत्रणेने नागरिकांना वीज पडण्याबाबतच्या सूचना द्याव्यात. त्यासाठी मोबाइल लाईटनिंग अ‍ॅलर्ट यंत्रणा विकसित करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे वेळेवर करण्यात यावीत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 या बैठकीस राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रधान सचिव, लष्कर, नौदल, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, कुलाबा वेधशाळेचे अधिकारी आदी उपस्थित होते.