सर्वेक्षण कार्डचा ‘मरे’कडून वापर नाही; पश्चिम रेल्वेचा अहवाल ‘क्रिस’कडे सादर

मोबाइल तिकीट प्रणालीचा प्रसार करण्यासाठी एकीकडे जाहिरातबाजीचे तंत्र अवलंबणाऱ्या मध्य रेल्वेने या प्रणालीची व्याप्ती वाढवण्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. ही मोबाइल तिकीट प्रणाली साध्या मोबाइलवरही लागू व्हावी, यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमने (क्रिस) पश्चिम आणि मध्य रेल्वे यांना आपापल्या मार्गावर या प्रणालीचे सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. पश्चिम रेल्वेने आपल्या मार्गावरील सर्वेक्षण पूर्ण करून अहवालही सादर केला आहे. पण मध्य रेल्वेने सर्वेक्षणासाठी ‘क्रिस’ने देऊ केलेले सीमकार्डही अद्याप घेतलेले नाही. दुसऱ्या बाजूला मोबाइल तिकीट प्रणाली लागू असताना नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज नसल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या हाती तिकीट काढण्याचे उत्तम साधन देण्यासाठी रेल्वेने ‘क्रिस’च्या सहाय्याने मोबाइल तिकीट प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला, तरी महिन्यागणिक ही प्रणाली वापरणाऱ्यांची संख्या वाढती आहे. आता ही प्रणाली स्मार्टफोनधारक प्रवाशांशिवाय साधे मोबाइल वापरणाऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची तयारी ‘क्रिस’ने चालवली आहे. त्यासाठीचे तंत्रज्ञानही विकसित झाले असून युएसएसडी म्हणजेच युनिव्हर्सल सप्लिमेण्टरी सव्‍‌र्हिस डाटा या तंत्रज्ञानावर ही प्रणाली आधारली आहे.

स्मार्टफोनवरील मोबाइल तिकीट प्रणालीपेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने चाचणीसाठी ‘क्रिस’ने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सीमकार्ड आणि हँडसेट देऊ केले होते. त्यापैकी पश्चिम रेल्वेने ही चाचणी पूर्ण करून ‘क्रिस’ला सादर केलेल्या अहवालात काही सूचनाही केल्या आहेत. मात्र मध्य रेल्वेने सर्वेक्षण व चाचणी यांसाठी लागणारे हे कार्ड अद्याप ताब्यातच घेतले नसल्याची माहिती ‘क्रिस’च्या मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मध्य रेल्वे मोबाइल तिकीट प्रणालीबाबत उदासीन असून याआधीही मोबाइल तिकीट प्रणालीचा प्रसार करण्यावर त्यांनी भर दिला नसल्याची टीकाही होत आहे.

याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता मध्य रेल्वे मोबाइल तिकीट यंत्रणेबाबत सकारात्मक असल्याचे त्याने स्पष्ट केले. या यंत्रणेच्या प्रसारासाठी मध्य रेल्वेने जाहिरातीही तयार केल्या आहेत, मात्र ही यंत्रणा स्मार्टफोन धारकांसाठी याआधीच लागू झाली आहे. त्यामुळे साध्या मोबाइल धारकांसाठी पुन्हा एकदा चाचणी घेण्याची आवश्यकता नाही. साध्या मोबाइल धारकांना तिकीट प्राप्त झाल्याचा लघुसंदेश मिळणार आहे. त्यामुळे रेल्वेकडून त्यात आणखी काहीच चाचणी घेण्याची गरज नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.