उद्याने, मनोरंजन व खेळाची मैदाने, रुग्णालये, शाळा आदी ठिकाणी मोबाइल टॉवर उभारण्यास बंदी घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पालिका प्रशासनाने याबाबतचे सुधारित धोरण आखले आहे. या धोरणामुळे सार्वजनिक ठिकाणी मोबाइल टॉवर उभारण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
भारतीय दूरसंचार विषयक मार्गदर्शक तत्त्वे आणि राज्य सरकार २०१४ मधील अधिसूचनेतील तरतुदींनुसार रिलायन्स जिओ इन्फोकॉमला १,१६० ठिकाणी दूरसंचार सुविधा कक्ष आणि बेस स्टेशन उभारण्यास पालिकेची सुधार समिती आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिली होती. त्यानुसार हे दूरसंचार सुविधा कक्ष आणि बेस स्टेशन उद्याने, मैदाने, पदपथावर उभारण्यात येणार होते. मात्र अनेक सामाजिक संस्थांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यानंतर मनोरंजन आणि खेळाच्या मैदानांवर मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. आता पालिकेने या संदर्भात सुधारित धोरण आखले आहे. मुंबईमधील खासगी, तसेच पालिका व बेस्टच्या मालकीच्या इमारती आणि भूखंडांवर मोबाइल टॉवर उभारण्याबाबत पालिकेने सुधारित धोरण आखले आहे. या सुधारित धोरणात उद्याने, मैदाने आदी ठिकाणी मोबाइल टॉवर उभारणीस बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.