मोबाइलवर थ्रीजीच्या ऐवजी टूजीचीच रेंज मिळणे.. काही तास नेटजोडणी बंद असणे.. याचबरोबर आता मोबाइलवर बोलत असताना अचानक दूरध्वनीच खंडित होणे यासारखी अनेक खंडांतरे मुंबईतील मोबाइलधारकांच्या वाटय़ाला येत असून अपुरे मनोरे, हे त्याचे एकमेव कारण असल्याचे उघड होत आहे. मुंबई क्षेत्रात दरमहा दीड लाख ग्राहकांची भर पडत असल्याने अपुरे मनोरे त्यांना सेवा पुरविण्यात कमी पडत आहेत. आजमितीस मुंबई वर्तुळात ६७० मोबाइल मनोऱ्यांची कमतरता असून ही परिस्थिती आणखी काही महिने कायम राहिल्यास शहरातील अकरा ठिकाणे मोबाइलच्या ‘रेंज’बाहेर जाण्याची भीती आहे.
जग ‘फाइव्ह जी’पर्यंत पोहोचले असताना आपण ‘थ्रीजी’ सेवाही नीट देऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. मुंबई वर्तुळात सध्या ९२०० मोबाइल मनोरे असून ग्राहकांची गरज पूर्ण करण्यास आणखी ६७० मनोऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. यातील १०५ मनोरे ज्या सोसायटय़ांवर आहेत त्यांचे कंत्राट संपले आहे, पण मनोऱ्यांसाठी दरमहा २० ते ५० हजार रुपये भाडे मिळत असतानाही मोबाइल मनोऱ्यांमधून बाहेर पडणाऱ्या लहरी आरोग्यास घातक असल्याचे सांगत सोसायटय़ा मुदतवाढीस राजी नाहीत. अनेक ठिकाणी मनोरे काढण्यासाठी लगतच्या इमारतींकडूनही दबाव येत आहे. नवे मनोरे उभारण्यासाठी जागा मिळत नसल्याने कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, असे ‘सेल्यूलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’ (सीओएआय)च्या सूत्रांनी स्पष्ट केले.
मोबाइल मनोऱ्यांमधून बाहेर पडणाऱ्या लहरींबाबत लोकांमध्ये संभ्रम असून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचा ‘सीओएआय’चा प्रयत्न आहे. या लहरींचे प्रमाण किती असावे याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाते. मात्र हे प्रमाण आणखी कमी करावे, अशी लोकांची मागणी स्वीकारल्यास केवळ ‘टूजी’ इंटरनेटची सुविधाच शक्य असल्याचेही ‘सीओएआय’च्या सूत्रांचे म्हणणे आहे.
या भागांना संपर्कशून्यतेचा धोका?
चेंबूर (प.), अंधेरीतील लोखंडवाला परिसर, मालाड (प.), वांद्रे (प.), लालबाग, कफ परेड, ताडदेव, बाबुलनाथ, दादर येथील पारसी कॉलनी, घाटकोपर (प.), जोगेश्वरी (प.) या अकरा ठिकाणी ‘ब्लँक स्पॉट’ निर्माण होतील आणि तेथील मोबाइलसेवा रेंजबाहेर जाईल, अशी भीती ‘सीओएआय’च्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सुशोभित मनोरे
मोबाइल मनोऱ्यांना विरोध टाळण्यासाठी ते सुशोभित करण्याचीही कल्पना कंपन्यांच्या विचाराधीन आहे. यानुसार मनोऱ्याभोवती वृक्षवल्ली किंवा विविध कलाकृती करून तो भाग सजविला जाणार आहे. त्यामुळे मनोरा दिसणार नाही, तसेच सोसायटीचा तो भाग खूप चांगलाही दिसेल.
दरमहा सात नव्या मनोऱ्यांची गरज
मोबाइल कंपन्यांच्या मानकांनुसार २० हजार ग्राहकांमागे एक मनोरा असणे गरजेचे आहे. मुंबईतील मोबाइल ग्राहकांची संख्या दरमाह सुमारे दीड लाखांनी वाढते आहे. म्हणजे दरमहा सुमारे सात मनोरे कार्यरत होणे आवश्यक आहे.