मोबाइल लहरींचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा काही अभ्यासक करतात, तर काही अभ्यासक हा दावा चुकीचा असल्याचे सांगतात. या गोंधळात मानवी शरीरावर लहरींमुळे नेमका त्रास होतो की नाही हे सांगता येत नाही. यामुळे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने यामध्ये पुढाकार घेऊन देशातील १६ संस्थांना सुमारे दहा कोटींचे अनुदान देऊन याबाबत स्वतंत्रपणे अभ्यास करण्यास सांगितला आहे. या अभ्यासामुळे लहरींच्या मानवी आरोग्यावरील परिणामांचे नेमके चित्र समोर येण्यास मदत होणार आहे.
यातील काही संस्थांचा अभ्यास हा संयुक्तपणे होणार आहे, तर काही संस्थांचा अभ्यास स्वतंत्रपणे असणार आहे. संस्थांना विषयही देण्यात आले असून लहरींचा आरोग्यावर होणाऱ्या विविध प्रकारच्या परिणामांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्करोग, मेंदूवर होणारे परिणाम, जैवरसायन अभ्यास, पुनरुत्पादन पद्धती, झाडांवरील परिणाम, प्राणी आणि मानव यांच्यावर होणाऱ्या परिणामांतील फरक, यावरील उपाय आदी विषयांचा समावेश असणार आहे. या अभ्यासासाठी संस्थांना २० ते ३६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत संस्थांनी अभ्यास पूर्ण करून विभागाकडे सादर करावयाचा आहे. या अभ्यासासाठी विभागातर्फे शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. विभागाकडे सादर झालेल्या प्रस्तावांपैकी १६ संस्थांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून त्यांना निधी देण्यात आला आहे. यामध्ये दिल्लीतील एम्स या संस्थेला सर्वाधिक दोन कोटी ५३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती कौस्तव सरकार यांनी माहिती अधिकाराअंतर्गत केलेल्या अर्जाला उत्तर देताना विभागातर्फे स्पष्ट करण्यात आली आहे.