शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होतो आहे. विस्ताराबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपच्या नेत्यांनी कोणतीही चर्चा केलेली नसून, सध्या तरी शिवसेनेला केंद्रात आणखी मंत्रिपद मिळण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रात एकमेव मंत्री असलेले अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनीही राजीनामा द्यावा का, यावर विचार सुरू आहे. शिवसेनेला पुन्हा डावलण्यात आल्यामुळे अनंत गीते यांनी राजीनामा द्यावा, यावर पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. या संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत.
वाचा : मंत्रिपदासाठी लाचार होणार नाही; मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचा आक्रमक पवित्रा
दरम्यान, आगामी केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्यावर येऊन ठेपला असला तरी भाजपकडून शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. याविषयी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मी काहीच ठरवलेले नाही. शिवसेना कोणाकडेही मंत्रिपद मागायला गेलेली नाही आणि जाणारही नाही. आम्हाला राज्यमंत्रिपद नको, हे मी गेल्याचवेळी स्पष्ट केले होते. अशा तुकड्यांवर बोळवण होणे शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना मंत्रिपदासाठी कधीही लाचार होऊन भीक मागणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.