केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त सध्या भाजपकडून सुरू असलेल्या प्रचारावर शिवसेनेने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. मोदी सरकारला तीन वर्षे झाली म्हणून मुंबईचा शेअर बाजार उसळल्याचे कौतुक ज्यांना वाटते त्यांना शेतकऱ्यांचे कोसळणे व जिल्हा बँकांचे उद्ध्वस्त होणे कळत नसेल तर हे सरकार शेअर बाजारवाल्या मूठभर भांडवलदारांचे बटीक झाले आहे असे म्हणावे लागेल, असा सणसणीत टोला शिवसेनेने हाणला आहे.

..तर सत्तेतून बाहेर पडावे लागेल – खा. अडसूळ

सध्या भाजपकडून धुमधडाक्यात सुरू असणाऱ्या विकासकामांवरही अग्रलेखातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. नोटाबंदी’चा झटका सोडला तर तीन वर्षांत नवे काय घडले यावर आम्ही आज बोलू इच्छित नाही. काही महत्त्वाकांक्षी व भव्य प्रकल्प आधीच्या राजवटीत सुरू झालेच होते. त्या प्रकल्पांच्या उद्घाटनांचे सोहळे मात्र नव्या दमाने सुरू आहेत. ब्रह्मपुत्रा नदीवरील भूपेन हजारिका ढोला-सादिया पुलाच्या उद्घाटनाबाबत हे सत्य लपवता येणार नाही. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चेनानी-नाशरी भुयारी मार्गाबाबतही म्हणता येईल, असे सांगत सेनेने भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. याशिवाय, नोटाबंदीमुळे उद्योग क्षेत्रात मंदीची सुप्त लाट हेलकावे खात आहे व आयटी क्षेत्रात आतापर्यंत लाखभर लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. महाराष्ट्रालाही या मंदीचे तडाखे बसण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे नोटाबंदीमुळे जिल्हा बँकांचे कंबरडे मोडल्याने शेतकऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे झाल्याचा उत्सव सरकारी पातळीवर सुरू आहे. मात्र, या उत्सवात सामान्य जनता व शेतकरी सामील आहेत काय, याचे खरे उत्तर सरकारच्या प्रवक्त्यांनी द्यायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसारखे वागू नये