बदलापुरचे शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत यांची दोन दिवसापूर्वी झालेल्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात यावा. पोलिसांनी नि:ष्पक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करावी. अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रविवारी शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी  दिला.
राऊत यांच्या हत्येमागे कोणीही असो त्याचा शोध पोलिसांनी तात्काळ घेतला पाहिजे. यामध्ये कोणतेही राजकारण आडवे येता कामा नये. तसेच शिवसेना राऊत कुटुंबाच्या पाठिशी आहे, असे शिवसेनेचे आमदार व संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी बदलापूर येथे सांगितले. राऊत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते. मोहन यांचे बंधू प्रवीण राऊत यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत ज्या संशयीतांची नावे दिली आहेत. त्या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
कायदा सुव्यवस्था ढासळली
कल्याण ते बदलापूर परिसरातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. चोऱ्या, दरोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारी रोखावी , अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.