उल्हासनगरमधील चांदीबाई महाविद्यालयात जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा भररस्त्यात विनयभंग करून नंतर तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करणाऱ्या चौघांना पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली. गेल्या आठवडय़ात ही घटना घडली होती. पीडित विद्यार्थिनी सकाळच्या वेळेत महाविद्यालयात जात असताना एका चौकात राकेश मुलिया आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी  विद्यार्थिनीचा हात पकडला. त्या वेळी  तिच्याकडे भ्रमणध्वनीची मागणी केली. या प्रकाराला विद्यार्थिनीने प्रतिकार केला. या वेळी तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. घरी आल्यानंतर  तिने हा सारा प्रकार वडिल आणि भावाला सांगितला. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी ते चौकात आले. त्या वेळी राकेश आणि त्याच्या तीन साथीदारांनी या दोघांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. मारहाणीनंतर तीन जण फरार झाले होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांनी राकेशला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी औरंगाबाद येथे पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे, उपनिरीक्षक काजरी, वसंत भेरे यांचे पथक पाठवले होते. तेथून मनोज गुप्ता, भरत सोनावणे, दीपक धतोले यांना अटक केली. गेल्या काही दिवसांपूर्वी बंटी कुर्सिजा या व्यापाऱ्यावर हल्ला करून फरार झालेला बबल्या हा आरोपी या तीन आरोपींसोबत लपून बसल्याचे पोलिसांना आढळले. त्यालाही अटक केल्याची माहिती किशोर जाधव यांनी दिली.