भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये वास्तव्य असलेले घर ताब्यात घेण्यासाठी घरमालकाने राज्य सरकारला सोमवापर्यंत मुदत दिली आहे. गेल्या ८ महिन्यांपासून घर खरेदीच्या चाललेल्या संथ प्रकियेमुळे नाराज झालेल्या घरमालकाने पत्र पाठवून ही शेवटची मुदत दिली आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत पत्र पाठवून कळवले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या घरात वास्तव्य केले होते ते घर विकत घेऊन त्याचे स्मारकात रूपांतर करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. गेल्या ८ महिन्यांपासून या घर खरेदीची प्रकिया सुरू होती. घराचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने दोन कंपन्यांची नियुक्ती केली. दुसऱ्या कंपनीने घराचे मूल्यांकन ३० कोटी रुपये केले होते. मात्र महिना उलटूनही घर खरेदीचा अंतिम प्रस्ताव आला नव्हता. यामुळे घराचे मालक मायले यांच्या वतीने खरेदी व्यवहाराचे काम पाहणाऱ्या कंपनीचे संचालक अ‍ॅडम फ्रेंच यांनी गुरुवारी भारतीय उच्चायुक्ताला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. सोमवापर्यंत सरकारकडून निर्णय न कळवल्यास घर खरेदीची प्रक्रिया थांबवावी लागेल असेही पत्रातून स्पष्ट करण्यात आले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील सचिव एम. पी. सिंग यांनी त्वरित राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला हे पत्र पाठवून या अंतिम मुदतीबाबत माहिती दिली आहे. याबाबत सरकारने काय पावले उचलली ते जाणून घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.