५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आपल्याकडील काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी काळा पैसाधारकांनी विविध क्लृप्त्या योजल्याचे उघड होऊ लागले आहे. डबेवाले, इलेक्ट्रिशियन व दंतोपचारांत लागणाऱ्या उपकरणांचे पुरवठादार आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या माध्यमातून जुन्या नोटांच्या स्वरूपातील काळा पैसा पांढरा करण्यात आल्याची प्रकरणेही आताशा उजेडात येऊ लागली आहेत.

सरकारने ५०० व एक हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटा बँकांमधून बदलून घेण्याची प्रक्रिया थांबवल्यानंतर, प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील एका प्रसिद्ध केटररच्या कार्यालयावर छापा टाकला. त्यात ८० लाखांच्या नव्या नोटा तर ४० लाखांहून अधिक जुन्या नोटांचा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागला. संबंधित केटररची चौकशी केली असता त्यातून जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवनवीन शक्कलांच्या सुरस कथाच उजेडात येऊ लागल्या! या केटररने त्याच्याकडील बेहिशेबी रकमेच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी जेवणाचे डबे पुरवणाऱ्या एका कंत्राटदाराकडेच या कामाचे ‘कंत्राट’ दिले.

विशेष म्हणजे मुंबईकरांना जेवणाचे डबे पुरवणाऱ्या डबेवाल्यांपैकी हा डबेवाला नव्हता. तर, या केटररच्या जुन्या नोटा बदलून देण्याचे कंत्राट घेतलेल्या ‘त्या’ डबेवाल्या कंत्राटदाराने या कामासाठी ६० जणांची नियुक्ती केली. या सर्वाना दिवसभरात एकच काम, ते म्हणजे, वेगवेगळ्या बँकांत जायचे, रांगेत उभे राहायचे आणि जुन्या नोटा बदलून घ्यायच्या. या कामासाठी त्यांना चांगला मेहनतानाही देण्यात आला! आपल्याकडील जुन्या नोटांचा साठा रिता करण्यासाठी केवळ बडे व्यापारी, बिल्डर, सोने-चांदीचे व्यापारी, हवाला ऑपरेटर्स आदिंचीच लगबग नव्हती तर या प्रक्रियेत छोटीछोटी कामे करणारी मंडळीही मोठय़ा प्रमाणात सहभागी होती, हेही यातून उघडकीस आले. नोटाबदलाचा पर्याय सामान्यांना पैशांची अडचण भासू नये यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, त्याचा दुरुपयोग अनेक लोकांनी विविध पद्धतीने केल्याचे निरीक्षण एका प्राप्तिकर अधिकाऱ्याने नोंदवले. निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर प्राप्तिकर खात्याकडे बेहिशेबी रकमांची अनेक प्रकरणे आली. दररोज किमान दोन ठिकाणी तरी आम्हाला धाडी टाकाव्या लागतात. परंतु प्रत्येक धाडीत घबाड हाती लागते, असे नव्हे असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

५० आणि २० रुपयांच्या नव्या नोटा

  • रिझव्‍‌र्ह बँकेने ५० आणि २० रुपयांच्याही नव्या नोटा जारी करण्यात आल्याची घोषणा रविवारी केली. मात्र, जुन्या ५० आणि २० रुपयाच्या नोटाही चलनात कायम राहतील.
  • नव्या ५० रुपयाच्या नोटेवर पॅनेलमध्ये इनसेट लेटर राहणार नाही. तर २० रुपयाच्या नोटेवर इनसेट लेटर ठेवण्यात आले असून दोन्ही नोटांचा क्रमांक ‘एल’ या इंग्रजी अक्षराच्या मालिकेने सुरू होणार आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले. दोन्ही नोटांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी आणि वर्ष दिलेले असेल.