एका व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी सापळा लावून अटक केली. या बांधकाम व्यावसायिकाला गेल्या काही दिवसांपासून परदेशातून खंडणीसाठी फोन येत होते. कुख्यात गुंड रवी शेट्टी हे फोन करून या व्यावसायिकाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागत होता. खंडणीची रक्कम नाही दिली तर मुंबईतील कामे होऊ देणार नाही आणि ठार मारले जाईल अशा आशयाच्या धमक्या तो देत होता. यानंतर या गुंडाचे मुंबईतले दोन हस्तक व्यावसायिकाला पैसे देण्यासाठी फोन करत होते. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विनायक वत्स यांनी या खंडणीखोरांचा तपास सुरू केला होता. गुरूवारी खंडणीच्या रकमेतील पहिला हप्ता घेण्यासाठी या आरोपींना बोलावले. घाटकोपर स्थानकाजवळ दोन आरोपी आले असता त्यांना खंडणीविरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. या दोघांकडून सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. परदेशातील गॅंगस्टर्सना मुंबईतील उद्योगपतींची माहिती पुरवून त्याच्यासाठी खंडणीची रक्कम उकळण्याचे काम हे दोघे करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स, पोलीस निरीक्षक सचिन कदम, विनायक मेर, अनिल वाढवणे, जयवंत सकपाळ, संजीव धुमाळ आदींच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.