मान्सून जाता जाता पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात भारताच्या दक्षिणेकडे आणि बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून मुंबईसह कोकणात शनिवार-रविवारी काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या इतर भागांत मात्र तुरळक सरींचा अंदाज आहे.

जून वगळता कोणतीही प्रभावी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरलेल्या मान्सूनने अपुऱ्या पावसाविषयीचा केंद्रीय वेधशाळेचा अंदाज अचूक ठरवला. मात्र परतीच्या प्रवासावेळी मान्सून अनेकदा चकवे देत आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात राजस्थानवरून माघारी फिरलेला पाऊस विक्रमी वेळेत देशाबाहेर जाण्याचा अंदाज होता. मात्र बंगालच्या उपसागरावर सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत राहिल्याने पावसाळा लांबला आहे. उत्तर भारतात हवा कोरडी झाली असून वेधशाळेनुसार नागपूरसह महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतला आहे. मात्र आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रातही भारताच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या दोहोंच्या प्रभावाने पूर्व व पश्चिम या दोन्ही किनाऱ्यांवर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रामुळे पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप येथे जोरदार पाऊस पडणार आहे. या स्थितीचा प्रभाव मुंबईसह कोकणावरही पडणार असून बहुतेक ठिकाणी मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. शनिवार- रविवारी पावसाच्या सरींनंतर मात्र पुन्हा हवा कोरडी होण्याचा अंदाज आहे.

पश्चिम व पूर्व किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र असून काही वेळा अशा क्षेत्रांचे वादळात रूपांतर होण्याची शक्यता असते. सध्या तरी या हवामानातील या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून परतलेला मान्सून पुन्हा रेंगाळेल.
-कृष्णानंद होसाळीकर, हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक