राजकीय अस्तित्वासाठी एकेकाळी गिरणगावात ज्यांचा परस्परांशी घनघोर संघर्ष झाला आणि अजूनही तो कडवटपणा गेलेला नसताना केंद्र सरकारच्या कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी कम्युनिस्ट आणि शिवसेना यांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे. कामगारांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट व शिवसेना यांच्यासह इतर पक्षांशी सलग्न कामगार संघटनांचा १८ मार्चला विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. तर याच प्रश्नावर २० व २१ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या औद्योगिक बंदसाठीही सारे डावे-उजवे पक्ष व संघटना मैदानात उतरणार आहेत.
सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईचा कामगार, कष्टकरी व मध्यवर्गीयांना फटका बसत आहे. त्याचा निषेध म्हणून देशव्यापी आंदोलन करण्यासाठी आयटक या कम्युनिस्टप्रणित कामगार संघटनेने पुढाकार घेतला.
सरकारच्या विरोधातील आंदोलनात कम्युनिस्टप्रणिक आयटक, सिटू, शिवसेनेची भारतीय कामगार सेना, भाजपशी सलग्न भारतीय मजदूर संघ, काँग्रेसप्रणित इंटक अशा सर्वच डाव्या-उजव्या विचारांच्या संघटना एकत्र येणार आहेत.