रेल्वे प्रवासात महिला प्रवाशांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना लक्षात घेता, पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांत महिलांच्या डब्यात आणखी ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ऑगस्ट अखेरीस  सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील त्रुटी दूर होतील असा दावा पश्चिम रेल्वेचे अधिकारी करत आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील तीन रेल्वे गाडय़ांच्या नऊ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याच धर्तीवर आणखी १७ रेल्वे गाडीत ५० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी जूनपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यानंतर ऑगस्टअखेर सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. एका रेल्वे गाडीच्या तीन डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी किमान सात दिवस लागतात.