गेल्या काही वर्षांत प्रवासी संख्येच्या दृष्टीने प्रचंड फोफावलेल्या ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील फेऱ्या सध्या तुटपुंज्या असल्याची टीका प्रवाशांकडून होत असली, तरी येत्या काळात या सेवांमध्ये वाढ करण्याचा ठोस विचार मध्य रेल्वे करत आहे. त्यासाठी मध्य रेल्वेला १२ डब्यांच्या तीन गाडय़ांची प्रतीक्षा असून या गाडय़ा ताफ्यात दाखल झाल्यानंतर लगेचच या मार्गावर दिवसभरात २५ ते ३० सेवा वाढवल्या जाणार आहेत. मात्र मुख्य किंवा हार्बर मार्गावर सध्या तरी सेवा वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट केले जात आहे.
ठाणे-वाशी-पनवेल हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, रबाळे आदी स्थानकांच्या आसपास विविध नवीन कंपन्याही सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईतून बोरिवली-गोरेगाव या भागात कामाला जाणारे बहुतांश लोक ट्रान्स हार्बर मार्गाचा वापर करून ठाण्याहून रस्त्याने प्रवास करतात. परिणामी ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. पण या मार्गावर सध्या ठाण्याहून वाशी-पनवेल-बेलापूर येथे जाणाऱ्या आणि तेथून ठाण्याला येणाऱ्या फक्त २१० सेवा दिवसभरात चालतात.
या मार्गावर दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळीही आठ ते दहा मिनिटांच्या अंतराने फेऱ्या असल्याने प्रवाशांची गर्दी वाढते. सकाळीही एकामागोमाग एक गाडय़ा सोडणे शक्य होत नसल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. हा त्रास लक्षात घेऊन मध्य रेल्वेने या मार्गावरील सेवा वाढवण्याला प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. मध्य रेल्वेच्या परिचालन विभागातील एका बडय़ा अधिकाऱ्याने या गोष्टीला पुष्टी देत रेल्वे ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले.
सध्या हार्बर तसेच मुख्य मार्गावरील सेवा वाढवणे शक्य नाही. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर दोन फेऱ्यांमध्ये बरेच अंतर असल्याने आणि येथील प्रवासी संख्या वाढल्याने या मार्गावर फेऱ्या वाढवणे शक्य आणि गरजेचे आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यासाठी मध्य रेल्वेला केवळ १२ डब्यांच्या तीन गाडय़ांची गरज आहे.
सध्या उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात बंबार्डिअर गाडय़ा येत असून त्यापैकी तीन गाडय़ा पश्चिम रेल्वेवर आल्या आहेत. या तीन गाडय़ांच्या बदल्यात पश्चिम रेल्वेवरील तीन सिमेन्स गाडय़ा मध्य रेल्वेवर येणार आहेत. त्यापैकी एकच गाडी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. उर्वरित दोन गाडय़ा मिळाल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा वाढवण्याबाबत प्राधान्याने विचार केला जाईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.