मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे संपूर्ण शहराचा वेग मंदावला आहे. पावसामुळे विमानांच्या उड्डाणांनाही फटका बसला आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी साचल्याने ५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद राहणार आहे. १४ क्रमांकाच्या धावपट्टीवरून काही प्रमाणात उड्डाणे होत आहेत.


गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस कोसळत असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनही उशीराने धावत आहेत. पावसाचा जोर पाहता आणि हवामान विभागाने दिलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.


दरम्यान, या जोरदार पावसाचा फटका विमान प्रवाशांनाही बसला असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई विमानतळावर पावसामुळे अक्षरश: तळे साचल्याने विमानांच्या उड्डाणांना अडथळे येत आहेत. विमानतळावरील काही भागच सध्या सुरु असून इतर अनेक धावपट्ट्यांवर पाणी साचल्याने येथील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बाहेरुन येणाऱ्या अनेक विमानांच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून ती इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. पावसामुळे जेट एअरवेजची ६३ विमाने, इंडिगोची ८, स्पाईसजेटची ३ आणि गो एअरच्या एका विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, देशातंर्गत हवाई सेवा पुरवणाऱ्या विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची किंवा उड्डाणाचे वेळापत्रक बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे.

जोरदार पावसामुळे शहरातील वरळी सी लिंक, पेडर रोड, सायन ब्रीज येथील वाहतुक धीम्या गतीने सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मनमाड-मुंबई एक्सप्रेस, गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, सुरत इंटरसिटी आणि शताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.