चर्चगेट स्थानकात लोकल गाडी बफर तोडून प्लॅटफॉर्मवर चढल्याच्या घटनेसाठी मोटरमनची हलगर्जीच कारणीभूत असल्याचे चौकशीनंतर समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर मोटरमनच्या केबिनमध्ये शिरून ब्रेक प्रणालीत बिघाड करण्याचा प्रयत्न एका मोटरमनने केला होता. त्यासाठी त्याला आणखी एका रेल्वे कर्मचाऱ्याने मदत केली होती, यावरही या चौकशीत शिक्कामोर्तब झाले असून या दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी होत आहे. याबाबतचा अहवाल समिती प्रशासनाकडे शनिवारी सादर करणार आहे.
चर्चगेट स्थानकात २८ जून रोजी हा अपघात झाला होता. संबंधित गाडी मरिन लाइन्सपर्यंत व्यवस्थित आली असून त्या गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड नसल्याचे प्रथमदर्शनी समजत होते.
पश्चिम रेल्वेने या प्रकरणी चार सदस्यीय समिती नेमत चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीदरम्यानच अपघात झाल्यानंतर लगेचच दुसरा मोटरमन संबंधित गाडीच्या मोटरमन केबिनमध्ये शिरल्याचे आणि गाडीजवळ उभा असलेला कर्मचारी त्याला काही हातवारे करून सांगत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात दिसत होते. त्यामुळे मोटरमनला वाचवण्यासाठी ब्रेक प्रणालीत बिघाड करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू होती. त्यात तथ्य असल्याचे आढळल्यावर आता हा दुसरा मोटरमन आणि त्याला सूचना देणारा कर्मचारी या दोघांचीही चौकशी होणार असल्याचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर  सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले.