विक्रोळी व मुलुंडमध्ये चिकट सापळ्यात सापांचा बळी

उंदरांसाठी लावण्यात आलेले चिकट सापळे सापांच्या जिवासाठी घातक ठरत आहेत. हे सापळे उंदरांकरिता लावले जात असले तरी त्यांच्या मागावर असलेले सापही त्यात अडकून बळी जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विक्रोळी आणि मुलुंडमधून चिकट सापळ्याला चिकटलेल्या सापाला ‘रॉ’ या प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाचविले.

विक्रोळीच्या एलबीएस रस्त्यावरील संरक्षण विभागाच्या कार्यालयातून चिकट सापळ्यात अडकलेल्या विषारी सापाला वाचविण्यात आले. कार्यालयात उंदरांचा सुरसुळाट असल्याने कीटकनाशक फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्यांना पकडण्यासाठी चिकट सापळे लावून ठेवले होते. मात्र चिकटलेल्या उंदराचा मागोवा घेत आलेल्या घोणस जातीचा साप त्यात चिकटला गेला. ‘रॉ’ या प्राणिमित्र संघटनेच्या महेश इथापे या सर्पमित्राने त्या ठिकाणी जाऊन चिटकलेल्या सापाला सुखरूप सोडविले.

घोणस जातीचा साप विषारी असल्याने कर्मचाऱ्यांना त्याच्यापासून धोका होता. साप जिंवत असल्याने त्याचा बचाव करणेही आवश्यक असल्याचे इथापे यांनी सांगितले. सापळ्यामधून काढल्यानंतर सापाची प्रकृती चिंताजनक असल्याने वांद्रे येथील डॉ. दीपा यांच्या प्राण्यांच्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. याशिवाय मुलुंड येथूनही चिकट सापळ्यात चिकटलेल्या सापाला खाद्यतेल लावून सोडवले गेले आहे.

सापळ्यात चिकटलेल्या बेडकाला खाण्यासाठी साप त्या ठिकाणी आला होता. मात्र तोही सापळ्यात चिकटला गेला. २० मिनिटांच्या प्रयत्नानी ‘रॉ’चे संस्थापक पवन शर्मा यांनी त्याला सापळ्यातून सोडविले.

कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्था उंदरांना पकडण्यासाठी चिकट सापळे वापरण्याचा सल्ला देतात. मात्र त्यामुळे अनेक वेळा उंदीराबरोबरच त्याचे भक्षण करण्यासाठी आलेले प्राणीही त्याला चिटकले जातात. २००१ साली ‘केंद्रीय अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डा’ने अशा चिकट सापळ्यांवर बंदी आणली होती. तरीही कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्था अशा प्रकारचे सापळे ग्राहकांना उपलब्ध करून देतात.

‘रॉ’ या संघटनेने याआधीही मण्यार जातीच्या विषारी सापाचा अशा सापळ्यामधून सुखरूप बचाव केला आहे. सापांशिवाय चिकटलेल्या उंदीराला खाण्यासाठी आलेल्या घुबड, किंगफिशर जातीच्या पक्ष्यांनाही संघटनेतर्फे वाचविण्यात आल्याची माहिती स्वयंसेवकांनी या वेळी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.