प्रकरण चिघळण्याची चिन्हे; विरोधकांची मागणी फेटाळून मंजुरी

पालिका शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आणि योगा बंधनकारक करण्याची ठरावाची सूचना सत्ताधारी शिवसेना-भाजपने पालिका सभागृहात संख्याबळाच्या जोरावर मंजूर केली आहे.

पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगा करण्याचे बंधन घालण्यात येत असल्याच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीतर्फे शुक्रवारी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सूर्यनमस्कार प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळीच सूर्यनमस्कार आणि योगा करणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना भाजपच्या नगरसेविका समिती कांबळे यांनी पालिका सभागृहात मांडली होती. या ठरावाच्या सूचनेवरून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे ती पालिका सभागृहात सादर करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना पत्र पाठवून केली होती. मात्र तरीही स्नेहल आंबेकर यांनी ही ठरावाची सूचना सभागृहात मांडण्यास समिता कांबळे यांना परवानगी दिली.

शाळांमध्ये सूर्यनमस्कार आणि योगाचे बंधन लादणाऱ्या भाजपविरोधात शुक्रवारी आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय समाजवादी पार्टीने घेतला आहे.

योगा ऐच्छिक ठेवण्याची मागणी

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आणि योगा ऐच्छिक ठेवावे, अशी मागणी काँग्रेस आणि मनसेकडून करण्यात आली होती. तर समाजवादी पार्टीने सूर्यनमस्कार रद्द करावे, अशी मागणी करीत भाजपवर टीका केली होती. मात्र स्नेहल आंबेकर यांनी विरोधी पक्षांची मागणी फेटाळून लावत या ठरावाच्या सूचनेला मंजुरी दिली.

पालिका सभागृहात संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी समाजवादी पार्टीचा विरोध मोडून काढला होता. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे.

रईस शेख, सपाचे गटनेते.