वडापाव.. दोन रुपये.. हा आवाज घुमला श्रीमंत ताडदेव परिसरात. महागाईमुळे वडापावचे दर दहा रुपयांवर पोहोचले असतानाच मनसेने मात्र शुक्रवारी चक्क दोन रुपयात वडापाव विकले आणि तेही महापालिका आयुक्तांचा बंगला असलेल्या एम. एल. डहाणूकर मार्गावर.. फेरीवाले नोंदणी जाहीर झाल्यापासून बेफाम वाढलेल्या फेरीवाल्यांचा मनस्तापाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असतानाच दुसरीकडे जमावबंदीच्या आदेशाचा आसरा घेत मनसेच्या ‘फेरीवाल्या’ कार्यकर्त्यांना हटवण्यात आले.
नगरसेवकांच्या शाब्दिक सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आता मनसेने त्यांच्या ‘स्टाइल’चे आंदोलन सुरू केल़े  दादर रेल्वे स्थानकाजवळ काल- परवा बसू लागलेल्या फेरीवाल्यांनाही नोंदणी अर्ज देत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांना तेथून पिटाळून लावल्यावर मनसेने शुक्रवारी थेट आयुक्तांच्या घरासमोरच दुकाने थाटली. वडापाव, पालिकेचे फोटो आणि कपडे अशी तीन दुकाने डहाणूकर मार्गावर आयुक्त सीताराम कुंटे यांच्या बंगल्याजवळ सकाळी साडे अकराच्या सुमारास थाटण्यात आली.
मनसेच्या कार्यकर्त्यांनीच ग्राहक म्हणून या स्टॉलवर येण्यास सुरुवात केली आणि या रस्तांवरील बडय़ा प्रस्थांच्या बंगल्यांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. तातडीने ताडवाडी पोलिस ठाण्यातून पोलिसांची फौज मागवण्यात आली. अखेर सुरक्षेला बाधा येण्याच्या कारणावरून जमावबंदीच्या आदेशाचा आसरा घेत मनसेचे विभागाध्यक्ष विजय घरत यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडण्यात आले.
आयुक्तांच्या बंगल्यासमोर आंदोलन करूनही त्यांना बाहेर येऊन या प्रश्नाबाबत भूमिका घ्यावीशी वाटली नाही. मग सामान्यांसाठी हे काय करणार? असा प्रश्न मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.