एसटीच्या दरांमध्ये ०.८० टक्क्यांच्या क्षुल्लक दरवाढीनंतर एसटी महामंडळाने गुरुवारपासून ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेतील चार ते सात दिवसांच्या तिकिटांचे दरही वाढविले आहेत. या दरांमध्ये पाच ते पंधरा रुपये एवढीच वाढ झाली असून यापूर्वीच देण्यात आलेले मात्र २८ ऑगस्टपासून सुरू होणारे पास त्यांची मुदत संपेपर्यंत वैध असतील. या पासधारकांकडून दरांतील फरक वसूल करून घेतला जाणार नाही.
साध्या गाडीचा गर्दीच्या हंगामातील चार दिवसांचा पास ८०५ ऐवजी ८१० रुपयांना मिळेल. सात दिवसांच्या पाससाठी १४०५ रुपयांऐवजी १४१० रुपये मोजावे लागतील. निमआराम गाडीचा चार दिवसांचा गर्दीच्या हंगामातील पाससाठी आता ९३० ऐवजी ९३५ रुपये आणि आंतरराज्य गाडीसाठी १००० ऐवजी १०१० रुपये मोजावे लागतील. निमआराम गाडीसाठी सात दिवसांच्या पाससाठी १६२५ ऐवजी १६३५ आणि आंतरराज्य गाडीसाठी १७५० ऐवजी १७६० रुपये अशी वाढ झाली आहे.