महाराष्ट्राच्या दुर्गम भागांतील गावांनाही मुख्य शहरांशी जोडणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी महामंडळाने त्रिसूत्री कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाची घोषणा एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी बुधवारी झालेल्या कार्यक्रमात केली. या त्रिसूत्री कार्यक्रमाद्वारे चालकांची आरोग्य तपासणी, त्यांना योग्य आणि अद्ययावत प्रशिक्षण आणि त्यांच्या आसनांमध्ये सुधारणा आदी गोष्टी हाती घेण्यात येणार आहेत.
महामंडळाच्या गाडय़ा अगदी दुर्गम भागांतील रस्त्यांवरून धावत असतात. रस्त्यांची स्थिती बिकट असल्याने आणि धाववेळ पाळण्याचाही ताण असल्याने अनेकदा चालकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत असतात. त्या दूर करण्यासाठी एसटीने काही उपाय आखले आहेत, असे खंदारे यांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे चाळीशी पार केलेल्या सर्व चालकांची र्सवकष वैद्यकीय तपासणी एसटीच्या खर्चाने करण्यात येणार आहे. या संपूर्ण तपासणीनंतरही काही समस्या आढळल्यास पुढील तपासण्याही एसटीच्याच खर्चाने करण्यात येणार आहेत. याशिवाय वारंवार बसून गाडी चालवण्यामुळेही चालकांना त्रास होतो. सध्याचे चालकांचे आसन हे जुन्या पद्धतीचे आहे. त्यामुळे त्यात बदल करून नवी आसने यापुढे गाडय़ांमध्ये बसवण्यात येणार आहेत. चालकांना एसटी चालवण्याचे धडे देण्यासाठी सिम्युलेटर एसटीच्या सहाही विभागांत हे सिम्युलेटर लवकरच बसवले जाणार आहेत. तसेच भोसरी येथे खास एसटी चालकांना धडे देण्यासाठी तयार केलेल्या रस्त्यावरही या चालकांना गाडी चालवण्याचे धडे देण्यात येतील.

भारमानापेक्षा  पाच प्रवासी जास्त!
वाहकांनी क्षमतेपेक्षा पाच जादा प्रवासी गाडीत घेण्याचा प्रयत्न करावा, असे कोणतेही विधान एसटीचे उपाध्यक्ष संजय खंदारे यांनी न केल्याचे महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. एसटीचे भारमान सध्या ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणजेच एसटीमध्ये सध्या क्षमतेपेक्षा ४० टक्के कमी प्रवासी असतात. हे भारमान वाढवण्यासाठी सध्याच्या प्रवासी संख्येपेक्षा प्रत्येक फेरीत किमान पाच प्रवासी जास्त नेण्यासाठी वाहकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खंदारे यांनी केले होते. सध्याच्या प्रवासी संख्येपेक्षा किमान पाच प्रवासी जास्त घेतले, तरीही एसटीच्या प्रवासी क्षमतेपेक्षा कमीच प्रवासी एसटीत असतील.