विविध आंतरराष्ट्रीय शहरांमधील अद्ययावत वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अखत्यारीतील असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगतर्फे (एएसआरटीयू) आयोजित परदेश दौऱ्यात एसटीचे पाच अधिकारी सहभागी होणार आहेत. हा अभ्यासदौरा यंदा ब्राझील येथे जाणार आहे. एसटीचा गेल्या वर्षीचा अभ्यासदौरा राजकारणी आणि उच्चपदस्थ यांच्या समावेशाने वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र यंदा नियमाप्रमाणे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यात महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, आदी राज्यांतूनही ३५ अधिकारी सहभागी होणार आहेत.
‘एएसआरटीयू’तर्फे दरवर्षीच परदेशातील एखाद्या शहरात अभ्यासदौरा आयोजित केला जातो. या दौऱ्यात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था, ई-बस, तिकीट प्रणाली आदी विविध गोष्टींची पाहणी केली जाते. या अभ्यासदौऱ्याचा सर्व खर्च ‘एएसआरटीयू’तर्फे करण्यात येणार असून त्याचा कोणताही भार राज्य सरकार किंवा एसटी महामंडळावर पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ब्राझीलमधील रिओ दी जॅनिरिओ या शहरातील वाहतूक व्यवस्था उत्तम मानली जाते. १ ते ८ नोव्हेंबर या दरम्यान हा अभ्यासदौरा आयोजित केला असून या दौऱ्यातून विकसनशील देशांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विविध पर्याय समोर येतील.
या दौऱ्यासाठी महामंडळाचे वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी एकनाथ मोरे, महाव्यवस्थापक (वाहतूक) कॅप्टन व्ही. व्ही. रत्नपारखी, महाव्यवस्थापक (प्रशिक्षण) मिलिंद बंड, वरिष्ठ योजना प्रक्रिया अधिकारी वीरेंद्र कदम, मुख्य अभियंता (मेकॅनिकल) पवणीकर हे अधिकारी ब्राझीलला जाणार आहेत.