कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा गवगवा करत महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) घेतलेल्या साडेपाच कोटी रुपये किंमतीच्या आलिशान आणि अवाढव्य पाच व्होल्वो बस कोकणच्या घाटातील अरूंद रस्त्यांवर धावण्यात अडचणी येत असल्याची उपरती होताच ‘एमटीडीसी’ने या गाडय़ा चालवण्यासाठी म्हणून खासगी बस कंपनीला अवघ्या वार्षिक १५ लाख रुपये अशा कवडीमोल दराने भाडेकरारावर दिल्याचे उघडकीस आले आहे. ‘एमटीडीसी’च्या या आतबट्टय़ाच्या व्यवहाराप्रकरणी दाद मागणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, अधिकाधिक पर्यटकांना अत्यंत आरामात कोकणातील निसर्गाचे दर्शन घडावे, त्यांना ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टवर जाता यावे यासाठी व्होल्वो बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्राथमिक चाचपणीनंतर एकूण तीन कोटी ८२ लाख रुपये किमतीच्या पाच व्होल्वो बस निवडण्यात आल्या. पण काही दिवसांनी अधिक अवाढव्य आणि महाग अशा एकूण पाच कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या बस खरेदी करण्याचा निर्णय झाला.
या पाच कोटी रुपयांच्या बस मोठा गाजावाजा करत, थाटामाटात पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी झेंडा दाखवल्यानंतर कोकणच्या प्रवासावर जाऊन आल्या. पण कोकणच्या पर्यटनासाठी घाटातील आणि कोकणातील रिसॉर्टनजीकच्या छोटेखानी रस्त्यांवर या महाकाय बस चालवणे कठीण असल्याचा ‘साक्षात्कार’ महामंडळाच्या अधिकाऱ्यांना झाला. त्यामुळे या बस गॅरेजमध्ये धूळखात पडून राहिल्या. असेच आणखी काही काळ चालले तर उरलीसुरली प्रतिष्ठाही धोक्यात येईल याची जाणीव झाल्याने महामंडळाने अखेर बस भाडेकराराने देण्यासाठी निविदा मागवल्या. त्यातही पहिल्या टप्प्यात यश आले नाही.
अखेर ‘मे. आर. एम. एस. एस. बसेस प्रा. लि.’ या कंपनीस एक बस दरवर्षी अवघ्या तीन लाख रुपये इतक्या कवडीमोल दराने भाडेकरारावर देण्यात आल्या आहेत. म्हणजेच पाच कोटी ४१ लाख रुपयांच्या पाच व्होल्वो बसपोटी ‘एमटीडीसी’ला वर्षांला अवघे १५ लाख मिळणार आहेत. ही रक्कम पाच कोटी रुपये बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षाही कमी आहे, असे हे सर्व प्रकरण माहिती अधिकारातून उघड करणारे दिलीप आजगावकर यांनी सांगितले.